सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

संमोहकाला काही दैवी शक्ती असते काय?

प्रश्न १३- संमोहकाला काही दैवी शक्ती असते काय?


उत्तर- संमोहकाला कोणतीही दैवी शक्ती नसते (ती अन्य कोणालाही नसतेच, कारण दैवी शक्ती या नावाची गूढ शक्ती अस्तित्वातच नाही.) संमोहनाचा संबंध आपल्या समाजात परंपरागत कल्पनेच्या तथाकथित वशीकरण विद्येशी लोक जोडतात. अस्तित्वातच नसलेली वशीकरण विद्या जे मानतात ते बहुधा ही गूढ वा दैवी शक्ती मानतात, आणि मग स्वाभाविक तिचा आविष्कार जो संमोहक करतो, त्याला काही दैवी शक्ती आहे असे मानले जाते.
संमोहित अवस्थेत असलेली व्यक्ती संमोहकाचे अनेक आदेश स्वीकारते. जागृत अवस्थेत तीच व्यक्ती ज्या गोष्टी करताना आढेवेढे घेईल, लाजेल, बुजेल त्या गोष्टी सहजपणे केल्या जातात. उदा. गाणे म्हणणे, भाषण देणे, नाचणे, ज्युडो खेळणे, शर्ट उलटा घालणे वगैरे. हे सारे ज्या संमोहकाच्या आदेशावरून केले जाते त्याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? असा प्रश्न मग हे प्रकार बघणाऱ्यांना पडतो.
हा प्रश्न लोकांना पडतो याचे कारण संमोहन या मनाच्या विशिष्ट अवस्थेबद्दल त्यांना काहीही माहिती नसते. संमोहन अवस्थेचे वैशिष्ट्य व लक्षणच हे असते, की संमोहित होणारी व्यक्ती स्वतःहून संमोहन निद्रेत जाते व त्या अवस्थेत ती इतरांना वा तिलाही इतर वेळा हास्यास्पद वाटणाऱ्या सूचनांचे पालन करते. कारण संमोहित अवस्थेत त्या व्यक्तीचे सूचनावर्तित्व वाढलेले असते व ते संमोहकाच्या सूचनांशी जोडलेले असते. शिवाय मनाची चिकित्सक बुद्धी (योग्य काय, अयोग्य काय, याचा विवेक) ही एका मर्यादेपर्यंत तहकूब झालेली असते. मनाच्या विशिष्ट गुणधर्माने होणाऱ्या वस्तुस्थितीचा विचार न करता संमोहकाच्या दैवी शक्तीने हे घडते असे म्हणणे ही दिशाभूल आहे. कोणाच्याही आवाजात दिलेल्या सूचना, प्रत्यक्ष वा टेपवरील, नीटपणे ऐकल्या व अनुसरल्या तर संमोहित होऊ इच्छिणारी व्यक्ती संमोहित होते, स्वतःच स्वतःला सूचना देऊनही व्यक्ती हे करू शकते. या सर्वांवरून हे स्पष्ट होते की संमोहकाला कोणतीही दैवी शक्ती नसते.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा