प्रश्न १०- बुवाबाजीचे भक्ष्य प्रामुख्याने स्त्रियाच का असते?
उत्तर- स्त्री ही भोगवस्तू आहे. तिचा उपभोग घेणे ही रास्त आकांक्षा आहे, असे बुवाला वाटते. दुसऱ्याच्या कलाने चालण्याचे स्त्रीचे अंगभूत दुबळेपण बुवाबाजीला बळी पडण्यात पोषक असते.मूल न होणे, मुलीच होणे, विवाहानंतर लगेच पतीचा आकस्मिक मृत्यू होणे याला स्त्रिया जबाबदार धरल्या जातात. सासू, नवरा, नणंद वगैरेंनी टोचून बोलण्यातून अशा स्त्रीचा कोंडमारा होऊ लागतो. दैवी उपायांनी संतती होऊ शकते, ही श्रद्धा पूर्वसंस्कारातून अशा स्त्रियांना प्राप्त असते. साहजिकच अशी स्त्री बुवारूपी अजगराच्या विळख्यात सहजपणे येते.
लैंगिक अतृप्ती हे आणखी एक महत्वाचे कारण. वैध समाजमान्य मार्गाने कामवासना पुरी होत नसेल तर अशा स्त्रिया बुवांकडे आकर्षित होतात. ६० स्त्रियांना फसवणाऱ्या वाघमारे बाबाची एजंट असलेली बाई अतृप्त कामवासनेची शिकार होती. तिच्या पतीला दम्याचा विकार होता. दम्यावर औषध मिळविण्याच्या शोधात ती वाघमारे बुवाकडे गेली आणि त्याच्या युक्तीला बळी पडली.
बुवाबाजीला स्त्रिया बळी न पडण्यासाठी स्त्रियांना शिक्षण हवे. विशेषतः ग्रामीण भागात स्त्री-शिक्षणाचा प्रसार अधिक वेगाने व्हावयास हवा. त्याचबरोबर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात स्त्री समर्थपणे उभी राहू शकेल हे बघावयास हवे.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा