प्रश्न १८- वृत्तपत्रांमध्ये व्यक्ती विशेषतः – शाळकरी मुले – यांनी एखाद्या व्यक्तीकडे बघितले व ती संमोहित झाली, दोन – तीन दिवसांनी भलतीकडे आढळून आली अशा बातम्या मधूनमधून वाचावयास मिळतात, त्यातील तथ्यांश कोणता?
उत्तर- या बातमीमधला तथ्यांश एवढाच, की ही एक लोणकढी थाप आहे. कारण संमोहित होणाऱ्या व्यक्तीचे सहकार्य नसेल तर ती व्यक्ती संमोहन अवस्थेत जात नाही. रस्त्यावरील एखादा इसम वा शाळकरी मुलगा त्यांना संमोहन करू इच्छिणाऱ्याला सहकार्य देणे शक्यच नाही. उलट विरोधच करेल. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने नुसते रोखून बघितल्यामुळे संबंधित इसम वा शाळकरी मुले संमोहित होणे अशक्य आहे. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शाळकरी वयाच्या मुलांना त्यांनी सहकार्य दिले, तरी संमोहित करणे अवघड असते. कारण संमोहित होण्यासाठी संमोहकाच्या सुचनेशी स्वतःला काळजीपूर्वक जोडून घेणे आवश्यक असते. ही एकाग्रता शाळकरी मुलांच्यात आढळणे खूप अवघड असल्याने ती संमोहित होणे कठीण असते. वेड लागलेल्या माणसांच्यात ही एकाग्रता अजिबातच नसते. ती स्वतःच्याच विश्वात वावरत असतात. एखाद्या सूचनेकडे लक्ष देण्याचा त्यांचा कालावधी इतका कमी असतो, की संमोहित होण्यासाठी लागणारे किमान मानसिक तादात्म्यही त्यांच्याकडे नसते. त्यामुळे ती अजिबात संमोहित होऊ शकत नाहीत.याचाच अर्थ असा की, संमोहित होऊन शाळकरी मुलगा/मुलगी वा प्रौढ व्यक्ती एखाद्याच्या मागे गेली ही बातमी आपण वाचतो. त्या वेळी आपल्या दोन-तीन दिवसांच्या गैरहजेरीचा खुलासा देणे इष्ट व शक्य नसल्याने लोकांना पटण्यासारखे काहीतरी कारण देण्यासाठी संबंधितांनी केलेला तो बनाव असतो. बहुसंख्य लोकांचा या स्वरूपाच्या प्रकारावर विश्वास असल्याने हे कारण सांगितल्यावर (आणि त्या काळातील काही आठवत नाही अशी पुस्ती जोडल्यावर) दोन-तीन दिवसांच्या गैरहजेरीतील सर्व तपशील देण्याची जबाबदारी आपोआप टाळली जाऊन सुटका होते.
आणखी काही बाबी ध्यानात घ्यावास हव्यात. संमोहकाने कोणत्याही व्यक्तीच्या, मुलांच्या डोळ्यात रोखून पाहिले म्हणून संबंधित व्यक्ती कधीही संमोहित होत नाही. त्याला विशिष्ट सूचना द्याव्या लागतात. संमोहन अवस्था कधीही दोन-तीन दिवस टिकत नाही. व्यक्ती फार लवकर जागृत होते, अन्यथा संमोहन अवस्थेतून नैसर्गिक निद्रा-अवस्थेत जाते व झोप संपल्यावर नेहमीप्रमाणे जागृत होते. एका प्रकारच्या मानसिक आजारात व्यक्ती (Dissosciated state of mind) दोन-तीन दिवस असे गोंधळल्यासारखे पूर्वीचे संदर्भ विसरून वागू शकते, पण तो आजार आहे संमोहन अवस्था नव्हे.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार...