प्रश्न ११- आजच्या अस्थिर समाज-जीवनात बुवा, बाबा ही मंडळी समाजाची मानसिक गरज भागवितात. तुमच्याकडे पर्याय नसताना त्यावर आगपाखड कशासाठी?
उत्तर- बुवा दोन गोष्टी करतात, असा त्यांचा दावा असतो. ते अडचणीत असलेल्या आपल्या भक्तांना दिलासा देतात. भक्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करतात.‘मला शरण या, माझी सेवा करा. तुमचे प्रश्न सुटतील’ असे सांगणारे बुवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतात काय? या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ हेच द्यावे लागेल.
सातारा जिल्ह्यात उडतारे गावी प्रतिज्ञानंद महाराजाने एका शेतकऱ्याला ‘तुझे कोड बरे करतो’ असे सांगून त्याची जमीन आश्रमासाठी दान-पत्राने हडप केली. शेतकऱ्याचे कोड तसेच राहिले.
केडगावच्या नारायण महाराजांनी कल्याणच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याला सपत्नीक राहावयास बोलावले. त्यास पुत्र पाहिजे होता. व्यापाऱ्याच्या पत्नीशी संग करून त्यास पुत्र दिला खरा, पण बाईचा उपभोग घेण्यात व्यापाऱ्याची अडचण होत आहे हे लक्षात येऊन त्याने कानडी गुंडाकरवी व्यापाऱ्याला नदीत बुडवून मारले. ही भयानक हकीकत आचार्य अत्र्यांच्या ‘अशा गोष्टी अशा गमती’ या पुस्तकात विस्ताराने आली आहे.
प्रश्न सुटत नसतील तर केवळ मानसिक दिलासा कशासाठी? उलट धैर्य, आत्मविश्वास, विज्ञान दृष्टी यांचा वापर करून प्रश्नांच्या मुळाशी भिडण्याची वृत्ती विकसित झाली पाहिजे. पण अशा विकासाला बुवाबाजी मारक ठरते. कारण बुवा लोकांना अगतिक, निर्बुद्ध ठेवण्याची प्रक्रिया वाढवीत असतात. कुबड्यांचे आधार बळकट करीत असतात.
उलट कुबड्या काढून टाकल्या, तर सामर्थ्यानिशी बळ एकवटून व्यक्ती आत्मनिर्भर बनेल. ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या पुस्तकात श्यामला विहिरीत पोहायला लावण्याचा प्रसंग आहे. विहिरीत सोडल्यानंतर श्याम ओरडतो. आधार काढल्यावर धडपडतो, पण यातून तो हातपाय हलवायला लागतो व पोहायला शिकतो. त्याची भीती नाहीशी होते.
बुवा भीती वाढवीत असतात. अज्ञान वाढवीत असतात. खोट्या कल्पनांतून दैववादाचा प्रचार करीत असतात. बुवा भूत उतरवतात तसे भूत लावतात. म्हणून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बुवाकडे जाने धोकादायक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
बुवा दिलासा देतात. बुवाऐवजी दिलासा देणारी पर्यायी केंद्रे सामाजिक कार्यकर्त्यांनी उभी केली पाहिजेत. असे पर्याय उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात अं. नि. समिती करत आहे.
सुरुवात केल्याशिवाय मार्ग कसा सापडेल? नव्या विचाराची दिशा पर्यायी मार्ग देत राहील.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा