सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

मोहिनी अथवा वशीकरण विद्या म्हणजेच संमोहन काय?

प्रश्न १२- जुन्या ग्रंथांतून सांगितलेली मोहिनी अथवा वशीकरण विद्या म्हणजेच संमोहन काय? 

उत्तर- जुन्या ग्रंथांतील मोहिनी अथवा वशीकरण विद्या हा एक कल्पनाविलास आहे. यामध्ये तथ्यांश नाही. आपणास इच्छित असलेल्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडावा, तिने आपल्या सूचनेबरहुकुम वर्तन करावे असे वाटणे स्वाभाविक होते (आहे). सुंदर स्त्री, शत्रूकडील माहिती मिळविण्यास उपयुक्त ठरणारी व्यक्ती, वगैरेंना आपल्या प्रभावाखाली आणण्याच्या तथाकथित शक्तीला मोहिनी अथवा वशीकरण विद्या असे नाव दिले गेले. त्यासाठी करावयाचे विविध उपायही जुन्या ग्रंथातून सुचविले आहेत. ते पूर्णपणे खोटे असून त्याला वास्तवाचा काडीचाही आधार नाही. उदाहरणार्थ – “पाल पकडावी, अंगावरील पूर्ण कपडे काढून तिचे दोन तुकडे करावेत, पालीचा शेपटाचा तुकडा काही काळ वळवळत राहतो. त्याच्याबरोबर दिगंबर अवस्थेत स्वतःही उड्या मारीत राहावे, वळवळण्याच्या गतीप्रमाणे स्वतःच्या उड्यांची गती कमी – जास्त करावी. शेपटाची वळवळ थांबल्यावर ती जाळावी. तिच्या राखेचे काजळ करावे व ते डोळ्यांत घालावे. ज्या स्त्रीला वश करावयाचे तिच्या पाठीमागच्या मानेच्या खाली रोखून बघत तिच्या मागोमाग, चालावे, त्या स्त्रीने मागे वळून बघितल्यास ती हमखास वश झाली म्हणून समजावे.” या स्वरूपाचे हे उपाय असतात.
संमोहन या मानसिक प्रक्रियेच्या आधुनिक मांडणीचा प्राथमिक प्रयत्न अठराव्या शतकात पहिल्यांदा मेस्मेरने केला. परंतु तोही बराचसा गूढ स्वरूपाचा होता. त्यानंतर ब्राईड चारकॉट याने त्यातील गूढता काढून त्यामागील शास्त्रीय सत्य हुडकण्याचे काम केले. फ्राईड बर्नहॅम, जेनेट फ्राईड अशा अनेक नामवंत शास्त्रज्ञांनी संशोधन केले. १९३० सालानंतर वैद्यकीय शास्त्रात अमेरिकेमध्ये त्याचा उपयोग ईरकिसन याने केला. संमोहन अवस्था व संमोहन याबाबतचे वर्णन सर्व समाजांत सर्व काळांत आढळते. मात्र त्यांचा शास्त्रीय विचार आधुनिक आहे.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा