सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

एखाद्या व्यक्तीकडे बघितले व मी संमोहित झालो, हे कसे?

प्रश्न १८- वृत्तपत्रांमध्ये व्यक्ती विशेषतः – शाळकरी मुले – यांनी एखाद्या व्यक्तीकडे बघितले व ती संमोहित झाली, दोन – तीन दिवसांनी भलतीकडे आढळून आली अशा बातम्या मधूनमधून वाचावयास मिळतात, त्यातील तथ्यांश कोणता?

उत्तर- या बातमीमधला तथ्यांश एवढाच, की ही एक लोणकढी थाप आहे. कारण संमोहित होणाऱ्या व्यक्तीचे सहकार्य नसेल तर ती व्यक्ती संमोहन अवस्थेत जात नाही. रस्त्यावरील एखादा इसम वा शाळकरी मुलगा त्यांना संमोहन करू इच्छिणाऱ्याला सहकार्य देणे शक्यच नाही. उलट विरोधच करेल. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने नुसते रोखून बघितल्यामुळे संबंधित इसम वा शाळकरी मुले संमोहित होणे अशक्य आहे. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शाळकरी वयाच्या मुलांना त्यांनी सहकार्य दिले, तरी संमोहित करणे अवघड असते. कारण संमोहित होण्यासाठी संमोहकाच्या सुचनेशी स्वतःला काळजीपूर्वक जोडून घेणे आवश्यक असते. ही एकाग्रता शाळकरी मुलांच्यात आढळणे खूप अवघड असल्याने ती संमोहित होणे कठीण असते. वेड लागलेल्या माणसांच्यात ही एकाग्रता अजिबातच नसते. ती स्वतःच्याच विश्वात वावरत असतात. एखाद्या सूचनेकडे लक्ष देण्याचा त्यांचा कालावधी इतका कमी असतो, की संमोहित होण्यासाठी लागणारे किमान मानसिक तादात्म्यही त्यांच्याकडे नसते. त्यामुळे ती अजिबात संमोहित होऊ शकत नाहीत.
याचाच अर्थ असा की, संमोहित होऊन शाळकरी मुलगा/मुलगी वा प्रौढ व्यक्ती एखाद्याच्या मागे गेली ही बातमी आपण वाचतो. त्या वेळी आपल्या दोन-तीन दिवसांच्या गैरहजेरीचा खुलासा देणे इष्ट व शक्य नसल्याने लोकांना पटण्यासारखे काहीतरी कारण देण्यासाठी संबंधितांनी केलेला तो बनाव असतो. बहुसंख्य लोकांचा या स्वरूपाच्या प्रकारावर विश्वास असल्याने हे कारण सांगितल्यावर (आणि त्या काळातील काही आठवत नाही अशी पुस्ती जोडल्यावर) दोन-तीन दिवसांच्या गैरहजेरीतील सर्व तपशील देण्याची जबाबदारी आपोआप टाळली जाऊन सुटका होते.
आणखी काही बाबी ध्यानात घ्यावास हव्यात. संमोहकाने कोणत्याही व्यक्तीच्या, मुलांच्या डोळ्यात रोखून पाहिले म्हणून संबंधित व्यक्ती कधीही संमोहित होत नाही. त्याला विशिष्ट सूचना द्याव्या लागतात. संमोहन अवस्था कधीही दोन-तीन दिवस टिकत नाही. व्यक्ती फार लवकर जागृत होते, अन्यथा संमोहन अवस्थेतून नैसर्गिक निद्रा-अवस्थेत जाते व झोप संपल्यावर नेहमीप्रमाणे जागृत होते. एका प्रकारच्या मानसिक आजारात व्यक्ती (Dissosciated state of mind) दोन-तीन दिवस असे गोंधळल्यासारखे पूर्वीचे संदर्भ विसरून वागू शकते, पण तो आजार आहे संमोहन अवस्था नव्हे.

-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार...

संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करणे शक्य आहे काय?

प्रश्न १७- संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करावयास लावणे शक्य आहे काय?

उत्तर- ज्या व्यक्तीने पूर्व - आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही वा चोरी करणे पाप आहे असा पक्का समज ज्या व्यक्तीचा आहे, अशा व्यक्तींकडून संमोहित अवस्थेत चोरी करून घेणे अशक्य आहे. संमोहन अवस्थेत व्यक्ती स्वतःला अनैतिक वाटणाऱ्या सूचना स्वीकारत नाही. अशा सूचना मिळाल्यास एकतर संमोहन अवस्थेतून ती जागृत अवस्थेत येते अथवा त्या अवस्थेत राहूनही त्या विशिष्ट सूचनांप्रमाणे वर्तन करणे नाकारते.
समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

संमोहित व्यक्ती काही दिवसानंतर देखील संमोहनाचे आदेश आपोआप मानते. हे कसे?

प्रश्न १६- संमोहित व्यक्ती काही दिवसानंतर देखील संमोहनाचे आदेश आपोआप मानते असे आम्ही बघितले आहे. हे घडणे कसे शक्य आहे?

उत्तर- व्यक्ती ज्या वेळी गाढ संमोहन अवस्थेत असते त्या वेळी तिला सूचना दिलेल्या असतात, त्यातील काही सूचनांची अंमलबजावणी संमोहन निद्रा उतरल्यानंतर ठराविक काळाने करावयाची असते किंवा काही सूचनांचे परिणाम हे काही काळाने दिसणारे असतात. सूचना परिणामकारकपणे पोचल्या असल्यास हे घडून येते. मुद्दा स्पष्ट होण्यासाठी दोन उदाहरणे घेऊ. समजा, रात्री उशिरापर्यंत झोप न येणाऱ्या व्यक्तीस संमोहित अवस्थेत अशी सूचना देण्यात आली की रोज रात्री जेव्हा तू दहाचे ठोके ऐकशील वा घड्याळात दहा वाजलेले बघशील त्या वेळी तुला लगेचच गाढ झोप येईल. ही सूचना संबंधित व्यक्तीने स्वीकारलेली असेल, तर रोज रात्री जेव्हा ती दहाचे ठोके ऐकेल वा घड्याळात दहा वाजलेले बघेल त्या वेळी तिचे शरीर या सूचनेची अंमलबजावणी करावयास लागेल. तिला जांभया येऊ लागतील.
समजा, संमोहन निद्रेत अशी सूचना दिली की ‘उठल्यानंतर पंधरा मिनिटांनी तू ग्लासभर पाणी घेशील. त्यातले दोन घोट तोंडात टाकून बाकीचे फेकून देशील’ तर ती व्यक्ती संमोहनातून जागृत झाल्यानंतर पूर्णपणे पूर्ववत (नॉर्मल) वागेल परंतु पंधरा मिनिटांनी ती ग्लासभर पाणी मागेल. त्यातील दोन घोटच तोंडात टाकून बाकीचे फेकून देईल. गंमत म्हणजे ‘तू असे का केलेस?’ असे विचारले तर ‘मला अशी सूचना दिली होती’ असे ती अजिबात सांगणार नाही (कारण तिला ती त्या स्वरुपात आठवत नसते.) उलट ती तिला तिच्या बुद्धीला सकृतदर्शनी बरोबर दिसणारे काहीतरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल की पाणी मचूळ होते, अस्वच्छ होते वगैरे.
घड्याळ व तत्सम इतर कोणत्याही साधनांच्या मदतीशिवाय कालमापन बऱ्याच अचूकपणे करता येणे हा संमोहन अवस्थेत सूचना स्वीकारणाऱ्या मनाचा एक गुण आहे. तितक्या कालावधीनंतर ती सूचना प्रगट मनास पोचून कार्यान्वित होते. सूचना दिलेल्या क्षणापासून अमुक इतक्या मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी, महिन्यांनी तुम्ही अमुक गोष्ट कराल अशी दिलेली सूचना अचूकपणे तेवढ्या कालावधीनंतर कार्यवाहीत येते. अर्थात, जी सूचना फक्त एकदाच अमलात आणावयाची असते. (उदा. ग्लासभर पाणी घेणे व दोन घोट घेऊन बाकीचे फेकून देणे) ती अमलात येणे सहज शक्य असते. दहाच्या ठोक्याला झोप येण्यासाठी सूचना ती स्वीकारली तरी तिचे सातत्य व प्रभाव टिकवण्यासाठी संबंधित व्यक्तीने संमोहनात जाऊन स्वतःला रोज ती सूचना देत राहावी लागते. अन्यथा गाढ संमोहन अवस्थेत स्वीकारलेल्या सूचनांची परिणामकारकता क्रमाक्रमाने कमी होत जाते. (या स्वरूपाच्या सूचना देतांना त्याबरोबर घ्यावयाची काळजीही सांगावयास हवी. उदाहरणार्थ, अशा व्यक्तीने रात्री दहा वाजता आपण वाहन चालवत असणार नाही वा रस्त्यातून चालत असणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. अन्यथा ठिकाणीच डोळ्यांवर झोप यावयास लागून अपघाताची शक्यता वाढेल).
मात्र संमोहित अवस्थेत जाणाऱ्या सर्वच व्यक्ती या स्वरूपाच्या (नंतर पार पाडव्याच्या) सूचना स्वीकारत नाहीत. तसेच ज्या व्यक्ती सूचना स्वीकारतात त्यांनाही त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी संमोहनाच्या अनेक सेशन्समध्ये या सूचना परत-परत देण्याची गरज असते.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

संमोहित झालेल्या व्यक्ती संमोहकाचे आदेश ऐकतात, हे कसे घडते?

प्रश्न १५- संमोहित झालेल्या व्यक्ती संमोहकाचे आदेश ऐकतात, हे आम्ही प्रत्यक्ष स्टेजवर पाहिले आहे. हे कसे घडते?

उत्तर- हे कसे घडते ते समजण्यासाठी प्रथम संमोहन म्हणजे काय हे समजावून घ्यायला हवे.
झोप, स्वप्न, तंद्री, बेशुद्धी या विविध मनोवस्थांप्रमाणेच संमोहन ही एक मनोवस्था आहे. आपल्या जागृत जाणिवेचे दोन भाग करता येतील. एक केंद्रित जागृती व दुसरी बाह्य जागृती. (म्हणजेच सभोवतालच्या परिस्थितीची सर्वसाधारण जाणीव.) संमोहन अवस्थेमध्ये बाह्य जागृती ही झोपेच्या पातळीवर असते. परंतु केंद्रित जाणीव (जी झोपेच्या अवस्थेमध्ये शून्यवत असते) ही मात्र संमोहन अवस्थेत वाढलेली असते, ती जास्तीत जास्त तीव्र असते व संमोहकाच्या (संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या ) सुचानांशी जोडलेली असते.
स्टेजवर गेलेली प्रत्येक व्यक्ती संमोहित होतेच असे नाही, परंतु संमोहकाच्या (हिप्नॉटिस्ट) सूचना ज्या व्यक्ती पटकन स्वीकारतात त्या व्यक्ती संमोहकांचे आदेश ऐकण्याचे आधी मनोमन कबूल करतात व मगच त्या आदेशाबरहुकुम झालेली कृत्ये आपणास स्टेजवर दिसतात. संमोहित होण्याबद्दलची संमोहकाची सूचनाही ऐकायचीच नाही अशी जी व्यक्ती ठरवेल ती संमोहित होणारच नाही, मग आदेश ऐकण्याचा प्रश्नही उपस्थित होणार नाही. संमोहित झाल्यानंतरही जे आदेश ऐकले जातात, ते निरुपद्रवी वा हास्यास्पद असतात. उदा. ‘डास चावत आहेत ते मारा’ असे म्हटल्यावर संमोहित व्यक्ती अंगावर चापट्या मारून डास मारू लागते. भांगडा नृत्य करा. म्हटल्यावर त्या व्यक्तीने जो भांगडा बघितला असेल, तसा अंगविक्षेप करण्याचा ती प्रयत्न करते. पोहा म्हटल्यावर जमिनीवर पालथे पडून पोहू लागते. जागृत अवस्थेमध्ये व्यक्ती हे करणार नाही कारण त्यातील निरर्थकता (डास नसताना डास मारणे) वा हास्यास्पदता (पाणी म्हणून जमिनीवर पोहणे) तिला माहीत असते. परंतु संमोहित अवस्थेत संमोहकाच्या आदेशानुसार वागण्याची सूचना तिने स्वतःहून स्वीकारलेली असल्याने ती या गोष्टी करते. यातील फोलपणा तिला समजत नाही, याचे कारण संमोहन अवस्थेत आपली चिकीत्सक वृत्ती लोप पावलेली असते.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार...

संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये काही विशेष सामर्थ्य असते काय?

प्रश्न १४- संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये काही विशेष सामर्थ्य असते काय? 


उत्तर- व्यक्तीला संमोहित करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीस संमोहकाच्या डोळ्यांत रोखून पाहण्यास सांगितले जाते व त्याचवेळी सूचना देणेही चालू असते. याचा एकत्रित परिणाम म्हणून व्यक्ती संमोहित अवस्थेत जाते. काही वेळा फक्त संमोहकाच्या डोळ्याला डोळा भिडवून एकटक पाहण्यास सांगितल्यानंतर व व्यक्तीने तसे केल्यानंतर काही वेळाने व्यक्ती आपोआप संमोहित होते. ही संमोहकाच्या डोळ्यांतील विशेष सामर्थ्याची किमया नव्हे. असे विशेष सामर्थ्य कोणाच्याही डोळ्यांत नसते. एकटक पाहण्याने डोळे थकतात व आपोआप मिटतात. व्यक्तीच्या कुठल्याही ज्ञानेंद्रियाला सातत्याने वापरून थकवले तर ती व्यक्ती संमोहन अवस्थेत जाण्याची शक्यता असते. सतत एकाच स्वरूपाचा नाद कानांवर पडत राहिला, तरी हेच घडून व्यक्ती संमोहन अवस्थेत जाण्याची शक्यता असते. वारंवार दीर्घकाळ घुमणे ही क्रिया व्यक्तीला संमोहित करण्यास उपयोगी पडते. संमोहकाच्या विशेष सामर्थ्याचा संमोहनात कधीही संबंध नसतो कारण असे काही सामर्थ्य मुळातच नसल्याने ते कोणातही असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

संमोहकाला काही दैवी शक्ती असते काय?

प्रश्न १३- संमोहकाला काही दैवी शक्ती असते काय?


उत्तर- संमोहकाला कोणतीही दैवी शक्ती नसते (ती अन्य कोणालाही नसतेच, कारण दैवी शक्ती या नावाची गूढ शक्ती अस्तित्वातच नाही.) संमोहनाचा संबंध आपल्या समाजात परंपरागत कल्पनेच्या तथाकथित वशीकरण विद्येशी लोक जोडतात. अस्तित्वातच नसलेली वशीकरण विद्या जे मानतात ते बहुधा ही गूढ वा दैवी शक्ती मानतात, आणि मग स्वाभाविक तिचा आविष्कार जो संमोहक करतो, त्याला काही दैवी शक्ती आहे असे मानले जाते.
संमोहित अवस्थेत असलेली व्यक्ती संमोहकाचे अनेक आदेश स्वीकारते. जागृत अवस्थेत तीच व्यक्ती ज्या गोष्टी करताना आढेवेढे घेईल, लाजेल, बुजेल त्या गोष्टी सहजपणे केल्या जातात. उदा. गाणे म्हणणे, भाषण देणे, नाचणे, ज्युडो खेळणे, शर्ट उलटा घालणे वगैरे. हे सारे ज्या संमोहकाच्या आदेशावरून केले जाते त्याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? असा प्रश्न मग हे प्रकार बघणाऱ्यांना पडतो.
हा प्रश्न लोकांना पडतो याचे कारण संमोहन या मनाच्या विशिष्ट अवस्थेबद्दल त्यांना काहीही माहिती नसते. संमोहन अवस्थेचे वैशिष्ट्य व लक्षणच हे असते, की संमोहित होणारी व्यक्ती स्वतःहून संमोहन निद्रेत जाते व त्या अवस्थेत ती इतरांना वा तिलाही इतर वेळा हास्यास्पद वाटणाऱ्या सूचनांचे पालन करते. कारण संमोहित अवस्थेत त्या व्यक्तीचे सूचनावर्तित्व वाढलेले असते व ते संमोहकाच्या सूचनांशी जोडलेले असते. शिवाय मनाची चिकित्सक बुद्धी (योग्य काय, अयोग्य काय, याचा विवेक) ही एका मर्यादेपर्यंत तहकूब झालेली असते. मनाच्या विशिष्ट गुणधर्माने होणाऱ्या वस्तुस्थितीचा विचार न करता संमोहकाच्या दैवी शक्तीने हे घडते असे म्हणणे ही दिशाभूल आहे. कोणाच्याही आवाजात दिलेल्या सूचना, प्रत्यक्ष वा टेपवरील, नीटपणे ऐकल्या व अनुसरल्या तर संमोहित होऊ इच्छिणारी व्यक्ती संमोहित होते, स्वतःच स्वतःला सूचना देऊनही व्यक्ती हे करू शकते. या सर्वांवरून हे स्पष्ट होते की संमोहकाला कोणतीही दैवी शक्ती नसते.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे

मोहिनी अथवा वशीकरण विद्या म्हणजेच संमोहन काय?

प्रश्न १२- जुन्या ग्रंथांतून सांगितलेली मोहिनी अथवा वशीकरण विद्या म्हणजेच संमोहन काय? 

उत्तर- जुन्या ग्रंथांतील मोहिनी अथवा वशीकरण विद्या हा एक कल्पनाविलास आहे. यामध्ये तथ्यांश नाही. आपणास इच्छित असलेल्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडावा, तिने आपल्या सूचनेबरहुकुम वर्तन करावे असे वाटणे स्वाभाविक होते (आहे). सुंदर स्त्री, शत्रूकडील माहिती मिळविण्यास उपयुक्त ठरणारी व्यक्ती, वगैरेंना आपल्या प्रभावाखाली आणण्याच्या तथाकथित शक्तीला मोहिनी अथवा वशीकरण विद्या असे नाव दिले गेले. त्यासाठी करावयाचे विविध उपायही जुन्या ग्रंथातून सुचविले आहेत. ते पूर्णपणे खोटे असून त्याला वास्तवाचा काडीचाही आधार नाही. उदाहरणार्थ – “पाल पकडावी, अंगावरील पूर्ण कपडे काढून तिचे दोन तुकडे करावेत, पालीचा शेपटाचा तुकडा काही काळ वळवळत राहतो. त्याच्याबरोबर दिगंबर अवस्थेत स्वतःही उड्या मारीत राहावे, वळवळण्याच्या गतीप्रमाणे स्वतःच्या उड्यांची गती कमी – जास्त करावी. शेपटाची वळवळ थांबल्यावर ती जाळावी. तिच्या राखेचे काजळ करावे व ते डोळ्यांत घालावे. ज्या स्त्रीला वश करावयाचे तिच्या पाठीमागच्या मानेच्या खाली रोखून बघत तिच्या मागोमाग, चालावे, त्या स्त्रीने मागे वळून बघितल्यास ती हमखास वश झाली म्हणून समजावे.” या स्वरूपाचे हे उपाय असतात.
संमोहन या मानसिक प्रक्रियेच्या आधुनिक मांडणीचा प्राथमिक प्रयत्न अठराव्या शतकात पहिल्यांदा मेस्मेरने केला. परंतु तोही बराचसा गूढ स्वरूपाचा होता. त्यानंतर ब्राईड चारकॉट याने त्यातील गूढता काढून त्यामागील शास्त्रीय सत्य हुडकण्याचे काम केले. फ्राईड बर्नहॅम, जेनेट फ्राईड अशा अनेक नामवंत शास्त्रज्ञांनी संशोधन केले. १९३० सालानंतर वैद्यकीय शास्त्रात अमेरिकेमध्ये त्याचा उपयोग ईरकिसन याने केला. संमोहन अवस्था व संमोहन याबाबतचे वर्णन सर्व समाजांत सर्व काळांत आढळते. मात्र त्यांचा शास्त्रीय विचार आधुनिक आहे.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

अस्थिर समाज-जीवनात बुवा, बाबा ही मंडळी समाजाची मानसिक गरज आहे का?

प्रश्न ११- आजच्या अस्थिर समाज-जीवनात बुवा, बाबा ही मंडळी समाजाची मानसिक गरज भागवितात. तुमच्याकडे पर्याय नसताना त्यावर आगपाखड कशासाठी?

उत्तर- बुवा दोन गोष्टी करतात, असा त्यांचा दावा असतो. ते अडचणीत असलेल्या आपल्या भक्तांना दिलासा देतात. भक्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करतात.
‘मला शरण या, माझी सेवा करा. तुमचे प्रश्न सुटतील’ असे सांगणारे बुवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतात काय? या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ हेच द्यावे लागेल.
सातारा जिल्ह्यात उडतारे गावी प्रतिज्ञानंद महाराजाने एका शेतकऱ्याला ‘तुझे कोड बरे करतो’ असे सांगून त्याची जमीन आश्रमासाठी दान-पत्राने हडप केली. शेतकऱ्याचे कोड तसेच राहिले.
केडगावच्या नारायण महाराजांनी कल्याणच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याला सपत्नीक राहावयास बोलावले. त्यास पुत्र पाहिजे होता. व्यापाऱ्याच्या पत्नीशी संग करून त्यास पुत्र दिला खरा, पण बाईचा उपभोग घेण्यात व्यापाऱ्याची अडचण होत आहे हे लक्षात येऊन त्याने कानडी गुंडाकरवी व्यापाऱ्याला नदीत बुडवून मारले. ही भयानक हकीकत आचार्य अत्र्यांच्या ‘अशा गोष्टी अशा गमती’ या पुस्तकात विस्ताराने आली आहे.
प्रश्न सुटत नसतील तर केवळ मानसिक दिलासा कशासाठी? उलट धैर्य, आत्मविश्वास, विज्ञान दृष्टी यांचा वापर करून प्रश्नांच्या मुळाशी भिडण्याची वृत्ती विकसित झाली पाहिजे. पण अशा विकासाला बुवाबाजी मारक ठरते. कारण बुवा लोकांना अगतिक, निर्बुद्ध ठेवण्याची प्रक्रिया वाढवीत असतात. कुबड्यांचे आधार बळकट करीत असतात.
उलट कुबड्या काढून टाकल्या, तर सामर्थ्यानिशी बळ एकवटून व्यक्ती आत्मनिर्भर बनेल. ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या पुस्तकात श्यामला विहिरीत पोहायला लावण्याचा प्रसंग आहे. विहिरीत सोडल्यानंतर श्याम ओरडतो. आधार काढल्यावर धडपडतो, पण यातून तो हातपाय हलवायला लागतो व पोहायला शिकतो. त्याची भीती नाहीशी होते.
बुवा भीती वाढवीत असतात. अज्ञान वाढवीत असतात. खोट्या कल्पनांतून दैववादाचा प्रचार करीत असतात. बुवा भूत उतरवतात तसे भूत लावतात. म्हणून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बुवाकडे जाने धोकादायक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
बुवा दिलासा देतात. बुवाऐवजी दिलासा देणारी पर्यायी केंद्रे सामाजिक कार्यकर्त्यांनी उभी केली पाहिजेत. असे पर्याय उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात अं. नि. समिती करत आहे.
सुरुवात केल्याशिवाय मार्ग कसा सापडेल? नव्या विचाराची दिशा पर्यायी मार्ग देत राहील.

-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

बुवाबाजीचे भक्ष्य प्रामुख्याने स्त्रियाच का असते?

प्रश्न १०- बुवाबाजीचे भक्ष्य प्रामुख्याने स्त्रियाच का असते?

उत्तर- स्त्री ही भोगवस्तू आहे. तिचा उपभोग घेणे ही रास्त आकांक्षा आहे, असे बुवाला वाटते. दुसऱ्याच्या कलाने चालण्याचे स्त्रीचे अंगभूत दुबळेपण बुवाबाजीला बळी पडण्यात पोषक असते.
मूल न होणे, मुलीच होणे, विवाहानंतर लगेच पतीचा आकस्मिक मृत्यू होणे याला स्त्रिया जबाबदार धरल्या जातात. सासू, नवरा, नणंद वगैरेंनी टोचून बोलण्यातून अशा स्त्रीचा कोंडमारा होऊ लागतो. दैवी उपायांनी संतती होऊ शकते, ही श्रद्धा पूर्वसंस्कारातून अशा स्त्रियांना प्राप्त असते. साहजिकच अशी स्त्री बुवारूपी अजगराच्या विळख्यात सहजपणे येते.
लैंगिक अतृप्ती हे आणखी एक महत्वाचे कारण. वैध समाजमान्य मार्गाने कामवासना पुरी होत नसेल तर अशा स्त्रिया बुवांकडे आकर्षित होतात. ६० स्त्रियांना फसवणाऱ्या वाघमारे बाबाची एजंट असलेली बाई अतृप्त कामवासनेची शिकार होती. तिच्या पतीला दम्याचा विकार होता. दम्यावर औषध मिळविण्याच्या शोधात ती वाघमारे बुवाकडे गेली आणि त्याच्या युक्तीला बळी पडली.
बुवाबाजीला स्त्रिया बळी न पडण्यासाठी स्त्रियांना शिक्षण हवे. विशेषतः ग्रामीण भागात स्त्री-शिक्षणाचा प्रसार अधिक वेगाने व्हावयास हवा. त्याचबरोबर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात स्त्री समर्थपणे उभी राहू शकेल हे बघावयास हवे.


-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार